Skip to main content

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्या नावाआधीचा "देशभक्त" काढायच्या काँग्रेसच्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंग दोतासरा म्हणाले, "सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात काहीच योगदान नव्हते. त्यांना विनाकारण महान असे दाखविण्यात आले. आमच्या समितीने पुस्तकातील इतिहास भक्कम पुराव्यावरून सांगितला आहे". ह्यावरून एका प्रसंगाची आठवण झाली. ती म्हणजे, "गांधी आमचे सावरकर तुमचे"(२ मार्च २०१६). अशी मुक्ताफळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उधळली होती. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कशी माफी मागितली ह्याची नक्कल केली (अशीच नक्कल मार्सेलिस उडीची केली असती तर फारच मज्जा आली असती). नोव्हेंबर २०१८ मध्ये छत्तीसगड दौ-यावर राहुल गांधी म्हणाले की, "सावरकर अंग्रेजोंसे हाथ जोडकर माफी मांग रहे थे, वो वीर नही डरपोक थे". काँग्रेसचा सावरकरद्वेष काही नवीन नाही. राहुल गांधी ह्या बाळाचा मला कधीच राग येत नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते जे काही लिहतात तेच राहुल गांधी रेटतात. पक्षातील मोठमोठी मंडळी आपला उल्लू साधण्यासाठी त्या बाळाचा खेळण्यासारखा वापर करतात. सावरकरांवर चिखलफेक करणारा नवीन नमुना म्हणजे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी. काँग्रेसमधील सन्माननीय नेत्यांनी सावरकरांबद्दल काय गौरवोद्गार काढले, आणि कसा सन्मान केला ह्याची दरवेळेला आठवण करून द्यावी लागते. ह्यापुर्वी काँग्रेसी नेत्यांचा सुर होता की, "आम्हाला १९०८ चे सावरकर पटतात, पण १९३७ चे सावरकर पटत नाहीत". थोड्या अंशी आम्ही समाधानी होतो. कारण, १९०८ च्या सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील जे योगदान होते त्याबद्दल काँग्रेस कृतज्ञ होती. आता गोविंदसिंग दोतासरा म्हणतात, सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात काहीच योगदान नाही ! भाजपने गांधी-नेहरू ह्यांच्यासोबत अन्य नेत्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नाकारले. म्हणजे आता ह्या लोकांचा १९०८ च्या सावरकरांबद्दल जो काही (बनावटी) आदर होता, तोसुद्धा संपला. त्या सावरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला लाज वाटते, कमीपणा वाटतो ! ६० वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने नेहमी हेच शिकवले की, सहज आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळाले. क्रांतिकारक व त्यांच्या कुटूंबियांची पुर्ण वाताहत व उपेक्षा केली. नरेंद्र मोदी हे चंद्रशेखर आझादांच्या गावाला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत. काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे की, कोणी स्वातंत्र्याचे श्रेय लाटले आणि कोणी क्रांतिकारकांचे योगदान नाकारले. बटुकेश्वर दत्त यांचे काय झाले ? त्याचे उत्तर द्या ! क्रांतिकारकांचे वंशज आजही चारचौघांप्रमाणे आपला चरितार्थ चालवत आहेत. आता तीन मुद्द्यांवर चर्चा करूया....१. सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, २. काँग्रेसमधील उदार नेत्यांची सावरकरांविषयी भावना, ३.आमचे गांधी तुमचे सावरकर. यासोबतच विद्रोही कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांचे लेखही देत आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान - 

१. १८९८ साली चापेकर बंधू आणि महादेव रानडे ह्यांना फाशी झाल्यावर त्यांना "चापेकर आणि रानडे यांचा फटका" लिहीला. 

२. इ.स. १९०० साली "संपुर्ण स्वराज्य" ही संकल्पना भारतात सर्वप्रथम मांडली. 

३. "स्वातंत्र्य वाटाघाटीने नव्हे, तर लढूनच मिळते". हे सावरकरांनीच प्रथम सांगितले. 

४. मित्रमेळा, अभिनव भारत ह्या क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या. अभिनव भारताच्या सदस्यतेची शपथ ब्रिटीश गुप्तहेर खात्याने अद्यापही जपून ठेवली आहे, ज्यात संपुर्ण स्वराज्याचा स्पष्ट उल्लेख आहे. 

५. १९०५ साली विद्यार्थीदशेत असताना त्यांनी विदेशी कापडांची होळी केली. गांधींनी त्याचा निषेध केला, मात्र १९२१ साली स्वताच्या हाताने विदेशी कापडांची होळी केली. 

६. १८५७ चा उठाव शिपायांचे बंड नसून ते स्वातंत्र्यसमर होते हे स्पष्ट केले. 

७. सावरकरांनी रशिया आणि आर्यलँडमधील क्रांतिकारकांप्रमाणे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेशी संबंध प्रस्थपित केला. 

८. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये लेख आणि हेग न्यायालयात आपल्या सुटकेचे प्रकरण नेऊन भारतीय सशस्त्र लढ्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. 

९. १९०७ साली स्ट्रीटगार्ड इथल्या परिषदेत मॅडम कामा ह्यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवला, त्यामागे प्रेरणा सावरकरांची होती. त्या समाजवादी परिषदेत बॅ. सरदारसिंग राणादेखील उपस्थित होते.

१०. सावरकरांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वामुळे अनेक तरूणांना ब्रिटीशांच्याविरोधात लढायची प्रेरणा मिळाली. 

११. कोणतीही परकीय सत्ता स्थानिक सैनिकांच्या निष्ठेवर अवलंबून असते, हे प्रथम सावरकारांनी हेरले. लंडनमध्ये शीखसैनिकांना गुप्तपत्रके पाठविली. 

१२. अंदमानातून मुक्त झाल्यावर त्यांना राजकारणात भाग घ्यायला बंदी घातली ! मात्र राजकारणावर लिहीण्यास आणि बोलण्यास बंदी नव्हती ! श्रद्धानंदमधून राजकीय तसेच सामाजिक विषयांवर लिखाण केले. १९२९-३० च्या काळात निनावी लिखाण करून चंद्रशेखर आझादांपासून स्फुर्ती घेतलेल्या तरूणांच्यातील अंगार फुलविण्याचा प्रयत्न केला. (पृ. ११५)

१३. बाबाराव सावरकर ह्यांच्या सोबत चंद्रशेखर आझादांची सशस्त्र क्रांतीवर चर्चा व बैठकी झाल्या होत्या. बाबाराव काशीत होते तेंव्हा त्यांच्या आजारपणात राजगुरूंनी त्यांची सेवा केला. (पृ.११७) 

१४. भगतसिंगांनी छापलेल्या स्वा.सावरकरलिखित १८५७ चे स्वातंत्र्यसमर पुस्तकाच्या प्रती बाबारावांच्या घरी सापडल्या. (पृ. ११८) 

१५. आझाद आणि भगतसिंग ह्यांच्या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून वीर सावरकरांवरील निर्बंध वाढविले. (पृ. ११९) 

१६. भगतसिंग आणि त्यांच्या मित्रांच्या फाशीची वार्ता ऐकल्यावर सावरकरांनी आपल्या घरावर काळे झेंडे फडकविले. (नेहमी भगवा झेंडा त्यांच्या घरावर फडकायचा) (पृ.१२४) 

१७. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ह्यांना फाशीची शिक्षा सुनावली, तेंव्हा लॅमिंग्टन पोलिस स्टेशनवर गोळीबार करण्यात आला. त्यात दुर्गाभाभी, गणेश वैशंपायन, पृथ्वीसिंग आझाद होते. (पृथ्वीसिंग आझाद सावरकरांसोबत अंदमानात शिक्षा भोगत होते). (पृ. १३०) संदर्भ - शोध सावरकरांचा. 

पुढे दुस-या महायुद्धात सैनिकीकरणावर भर दिला, नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना देशाच्या बाहेर जाऊन सैन्य उभारण्याची प्रेरणा दिली. सावरकरांच्या सैनिकीकरण मोहिमेमुळे आझाद हिंद सेनेला प्रशिक्षित सैनिक मिळाले.

काँग्रेसमधील उदार नेत्यांची सावरकरांविषयी भावना - 

वैयक्तिक मतभेद असले तरी सावरकरांसारख्या देशभक्ताच्या पंक्तीत बसायचा मान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यांचा स्वार्थत्याग आणि देशभक्तीची गोड फळे देशाला चिरकाल लाभतील - महात्मा गांधी. (लंडन विजयादशमी उत्सव १९०९) 

श्री. वि. दा. सावरकर हे आपण ब्रिटीशांच्या हाती सापडू नये म्हणून अदभूत मार्ग स्वीकारणे क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढणारे ते एक निश्चयी व निर्धारी नेता असल्याने त्यांचे चरित्र पुढच्या पिढीतील तरूणांना प्रेरणा देत राहिल - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

वीर सावरकरांच्या निधनामुळे आजच्या भारतातील एक महान विभूती काळाने हिरावून नेली आहे. ते साहस आणि देशभक्ती यांचे प्रतिक होते. असंख्य युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली - स्व. इंदिरा गांधी. (१९६६) 

सावरकरांचे जीवन हे साहसी कृत्याचे एक महाकाव्य आहे. ते तरूणांना सतत प्रेरणा देतील - शिक्षणमंत्री मंहमदकरीम छगला. (१९६६)

वीर सावरकरांचा काँग्रेसशी सैद्धांतिक मतभेद होता तरीही त्यांची देशभक्ती आणि देशप्रेम मतभेदातीत होती. त्यांनी आपले सर्वस्व देशार्पण केले ! - मुंबई काँग्रेस अध्यक्ष श्री. गवानजी अर्जूनजी खेमजी. (१९६६)

वीर सावरकरांच्या निधनामुळे देश एका महान स्वातंत्र्यवीरास मुकला आहे. त्यांनी ब्रिटीशांची सत्ता कधीच मान्य केली नाही, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनंत यातना सोसल्या - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण. (१९६६ साली वीर सावरकरांचे पुत्र विश्वास सावरकर यांना संदेश धाडला होता) 

वीर सावरकरांसारखे नेतृत्व जर हिंदूमहासभेला लाभले तर हिंदूमहासभेच्या राज्यात राहण्यास मला कोणतेही संकट वाटणार नाही. ते खरे देशभक्त होते - लोकसभेचे सभापती सरदार हुकूमसिंग. (१९६६) 

आमचे मार्गदर्शक होण्यास सावरकरच योग्य आहेत. विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करताना एक पुस्तक वाचत होतो. त्यात सावरकरांच्या आंतरराष्ट्रीय अभियोगाला दिलेले एक पान होते. माझ्या एका देदीप्यमान देशभक्ताचे उदाहरण वाचून मला गहिवरून आले. सोन्याची शुद्धी अग्नीने होते, तशी सावरकरांची कारावासाने झाली व ते चमकत आहेत - स.का.पाटील.  

कित्येक दशके सावरकर लढा देत राहिले. असीम त्याग करीत राहिले होते. त्यांना कोणतेही सरकारी सत्तास्थान मिळाले नाही किंवा कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय बहुमान मिळाला नाही. तरीदेखील त्याची खंत न बाळगता ते भारतीय तरूणांना राष्ट्र उभारणीचे आवाहन करीत राहिले. हे त्यांचे खरे थोरपण आहे. सावरकर हर्ष किंवा विशाद ह्याच्या पलीकडच्या पदवीला पोहोचले आहेत. त्यांच्या आशिर्वादाची देशाला गरज आहे - काकासाहेब गाडगीळ. (१९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यसमराच्या शताब्दीनिमित्त दिल्लीकरांना सावरकरांचा सत्कार केला. त्या समारंभात काकासाहेब गाडगीळ बोलत होते.) 

टिळक, मॅडम कामा, फिरोजशहा मेहता यांनी सावरकरांविषयी मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. गांधींचा उदय होण्यापुर्वी सावरकरांची मुक्तता झाली असती तर भारताने मोठी प्रगती करून दाखवली असती. पंजाबचा प्रश्न सावरकर सोडवू शकतील कारण हिंदू व शीख दोन्ही जातींमध्ये ते सारखेच लोकप्रिय आहेत. पण सरकारच्या मनात सावरकरांविषयी द्वेष असल्याने सरकार सावरकरांची मदत घेणार नाही अशी मला भिती वाटते. काँग्रेसचे नेते इतके कृघ्तन आहेत की, सावरकरांचे आपल्यावर इतके अपरंपार ऋण आहेत याची त्यांना जाणीवसुद्धा नाही. काँग्रेसच्या नेत्यांना एवढा दुष्टावा वाटण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे ते महाराष्ट्रीयन आहे. काळाबाजारवाले, पांढरी टोपी नि चोरटी दारूभट्टीवाले हे सारे काँग्रेसच्या दृष्टीने देशभक्त आहेत. - बी. एफ. भरूचा. (काँग्रेसचे जुने निष्ठावंत नेते, १९५८ साली सावरकरांच्या अमृतमहोत्सव प्रसंगात बोलत होते.) 

संदर्भ - आणि सावरकर - १२४, १२५, १२६ 

महायोगी सावरकर - ३५, ३६, ३७. 

गांधी आमचे सावरकर तुमचे - ह्या वक्तव्याचा आणि आताच्या घटनेचा काय संबंध ? असा प्रश्न पडला असेल ! कपूर आयोगाचा अहवाल सादर झाल्यावर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट प्रकाशित केले आणि नंतर स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाला रूपये ११,०००/- देणगी वैयक्तिक खात्यातून दिली. २८ मे १९७९ ला उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांनी मुख्यमंत्री शरद पवार ह्यांच्या उपस्थितीत स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा शिलन्यास केला. २८ मे १९८९ ला उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित झाले. 

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ह्यांनी सावरकरांचा उल्लेख देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी असा केला, त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. (५ नोव्हें २००४ टाईम्स ऑफ इंडिया) 

२८ मे २०१४ रोजी स्वा. सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावण्यात आले, तेंव्हा काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगड प्रचालक शिवराज पाटील चाकोरकर त्यावेळी उपस्थित होते. 

मग आता काँग्रेस अशी का वागत आहे ? ही पहिलीच वेळ नाही, काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांनी सावरकरांसोबत अन्य क्रांतिकारकांना अनुल्लेखाने मारण्याचे कार्य केले आहे. सावरकरद्वेषाची भावना पंडित नेहरूंच्या काळापासून पेरण्यात आली आहे. गांधीहत्येच्या प्रकरणात नेहरूंनी सफाईदारपणे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. १९५० साली लियाकत अलीच्या स्वागतामध्ये व्यत्यय नको म्हणून सावरकरांना बेळगावच्या हिंडलंगा तुरूंगात डांबले. वडिल नेहरूंच्या सावरकरविरोधाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींच्या सावरकर गौरवाची नोंद घेणे आवश्यक आहे. २ मार्च २०१६ रोजी राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका करता करता जीभ घसरली. "गांधी आमचे, सावरकर तुमचे" अशी राजकीय फाळणीच करून टाकली. गांधी आमचे ह्यापेक्षा जास्त सावरकर तुमचे ही भावना काँग्रेसी नेत्यांमध्ये दृढ होत चालली आहे. त्यामुळे ह्याच भावनेतून गेहलोत सरकारने हे पाऊल उचलले असावे ! सावरकरांचे हिंदुत्व देशाच्या केंद्रस्थानी आल्यामुळे काँग्रेसी नेत्यांची अडचण होत आहे, त्यामुळे सावरकरांचे चारित्र्यहनन करणे ही त्यांची राजकीय गरज आहे. 

भारतीय राजकारणात उत्प्रेरकासारखे कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर - अखेरीस सावरकर विचारांचे अभ्यासक चंद्रशेखर साने ह्यांचे विश्लेषण फार महत्वाचे आहे. ते लिहीतात, "सावरकर हे भारतीय राजकारणात रसायनशास्त्रातील उत्प्रेरकासारखे आहेत. उत्प्रेरकाचा रासायनिक प्रक्रियेत सहभाग नसतो तसाच रासायनिक घडामोडींचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. पण प्रक्रिया घडवून आणण्यात मात्र तो साहाय्यकारी ठरतो. उत्प्रेरक रासायनिक प्रक्रियाचा वेग वाढवते किंवा मंद करतो; पण स्वता मात्र निर्लेप राहतो. सावरकरांचे विचार प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होताना दिसत नाहीत. त्यांचे नाव देशात सरसकट सर्वांना माहिती नाही. १०० हुन अधिक वर्षे त्यांच्या नावाचा, विचारसरणीचा विरोध, द्वेष आणि गैरसमज करणे चालू आहे; पण सावरकरांचे नाव विरोधकांना मिटविणे शक्य झाले नाही. उत्प्रेरक म्हणून भारतीय राजकारणात सावरकरांचे अस्तित्व अढळ आहे. यावर अधिक भाष्याची आवश्यकता नाही". (दैनिक तरूण भारत : २० मार्च २०१६) 

- मिहीर कुलकर्णी. 

चित्रदालन -





Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...